हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवार पासूनच चर्चा सुरू झाली आहे. अखेर आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) मणिपूरमध्ये भारताचे हत्या केली” असा गंभीर आरोप लावला आहे. तसेच, “पंतप्रधान मणिपूरला भारत मानत नाहीत. मी मणिपूरला गेलो पण पंतप्रधान गेले नाहीत. मोदींना मणिपूरच्या घटनेवर कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
आज संसदेत बोलत असताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींविरोधात बोलताना राहूल गांधी म्हणाले की, मी मणिपूरला गेल्यानंतर माझी 2 महिलांसोबत भेट झाली. मी एका महिलेशी बोलायला गेल्यानंतर तिचा थरकाप उडाला होता. यानंतर ती बेशुद्ध पडली. ही दोन्ही उदाहरणे अशी आहेत की ज्यातून दिसून येते की, त्यांनी ( नरेंद्र मोदी) मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. नरेंद्र मोदी हे मणिपूरला भारत मानतच नाहीत.
तसेच, मणिपूरच्या घटने विषयी बोलताना “काही म्हणतात हा धर्म आहे, हे सोने-चांदी आहे. ही जमीन आहे. पण सत्य हे आहे की, या देशाचा आवाज एकच आहे. देशातील जनतेसाठी हे दु:ख, वेदना आणि अडचण आहे. हा आवाज ऐकायचा असेल, तर आपल्या हृदयातील अहंकार सोडून त्याच्या पलीकडे जावे लागेल. भारत हा या देशातील तमाम जनतेचा आवाज आहे. जर आपल्याला त्याचे ऐकायचे असेल तर आपल्याला अहंकार आणि द्वेषापासून मुक्त व्हावे लागेल” असे राहुल गांधींनी म्हणले.
भारतीय सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. पण तुम्ही ते वापरत नाही. कारण तुम्हाला मणिपूरमध्ये भारत मातेला मारायचे आहे. रामायणात रावण फक्त २ लोकांचे ऐकायचा. एक म्हणजे मेघराज आणि दुसरा म्हणजे कुंभकर्ण… त्याचप्रमाणे मोदीही फक्त २ लोकांचे ऐकतात, एक म्हणजे अमित शाह आणि दुसरे म्हणजे गौतम अदानी असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. तसेच हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने लंका जाळली. रामाने रावणाला मारले नाही, त्याच्या अहंकाराने मारले. तुम्ही देशभर रॉकेल टाकून देश पेटवत आहेत अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.