नवी दिल्ली । देशावर कोरोनाचे फार मोठं संकट आहे. या संकट काळात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. देश आणीबाणीच्या परिस्थितीत असून फक्त लॉकडाऊनमुळे कोरोनाशी लढता येणार नाही आहे. लॉकडाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा उपाय नसून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची सूचना काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
देशात कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती असून लॉकडाऊन हे त्याच उत्तर असू शकत नाही. लॉकडाऊन सोबत देशभरात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवणं जास्त गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितलं. देशात रँडम चाचण्या मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे, हेच करोनाशी लढण्याचे खरे शस्त्र आहे. लॉकाडाउन हे करोना व्हायरसवर औषध नाही, लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा व्हायरस डोकं वर काढणार, लॉकडाउन फक्त काही वेळासाठी व्हायरसला रोखतो, चाचणी हा एकमेव मार्ग आहे त्यातून आपल्याला व्हायरस कुठल्या दिशेला चालला आहे हे समजते. लॉकडाऊन हे पॉझ बटनासारखे आहे, त्याने करोना थांबल्यासारेख वाटेल पण जाणार नाही. राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा असावा हे राज्यांनी ठरवायला हवे असं राहुल यांनी यावेळी सांगितलं.
बेरोजगारीचं संकट गडद होणार, मोठ्या पॅकेजची गरज
करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
धान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज
आपण साठवलेलं धान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यापर्यंतही धान्य पोहोचलं पाहिजे. आपल्याकडे अधिकचं धान्य साठवलं आहे. आता पुन्हा तो साठा वाढेल, त्यामुळे धान्य गरजूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो डाळ, १ किलो साखर दर आठवड्याला देण्यात यावं, असंही राहुल गांधींनी नमूद केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”