Rahul Gandhi : शिवाजी पार्कवर आज राहुल गांधींची जाहीर सभा; पवार- ठाकरे उपस्थित राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तोफ आज मुंबई येथील शिवाजी पार्कवर धडाडणार आहे. राहुल गांधी प्रथमच शिवतीर्थावरून जनतेला संभोधित करतील. यावेळी मंचावर उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित असतील. कालच लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या असून आज शिवतीर्थावरून राहुल गांधी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची भव्य अशी सभा होणार असून आपल्या भाषणात राहुल गांधी नेमकं काय बोलतात?? कोणत्या मुद्द्यांना हात घालतात ते आता पाहावं लागणार आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि फोडाफोडीचे राजकारण यावरून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्कवर दिसणार इंडिया आघाडीची एकजूट – Rahul Gandhi

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची एकजूट पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, तेजस्वी यादव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, जम्मू काश्मीरचे फारुक अब्दुल्ला, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह विरोधी दलातील तब्बल १५ हुन अधिक पक्षाचे नेते शिवाजी पार्कवर उपस्थित राहतील आणि लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकतील.