राहुल गांधींना एक मजबूत टीम तयार करावीच लागेल- शिवसेना

rahul gandhi sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं  दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतही दारुणरीत्या पराभूत झालेले जितीन प्रसाद हे अखेर भाजपावासी झाले आहेत. प्रसाद हे काँग्रेसचे तरुण नेते. त्यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपामध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितीन प्रसाद यांना भाजपामध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे

उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत. याचा दुसरा अर्थ असाही काढता येईल की, उत्तर प्रदेशातील भाजपाचा पाठीराखा असलेला उच्चवर्णीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जात आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपामध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उड्या मारू लागले आहेत हा आहे. पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही,” असं शिवसनेनं म्हटलं आहे.

काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे. लोकशाहीला मारक असलेली ही स्थिती आहे. पक्षांतर्गत बंडाळय़ा या होतच असतात. त्यापासून भाजपसारखे पक्षही मुक्त नाहीत, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे हे अलीकडच्या काळातील काँग्रेसचे तरुण चेहरे होते व त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.