हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा सतत घसरण होत असणाऱ्या जीडीपीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार २०२० च्या आर्थिक वर्षात बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांग्लादेश लवकरच भारताला जीडीपीच्या बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे, असा अंदाज आयएमएफच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील चिंता आणखीन वाढली आहे. याचवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
राहुल यांनी यासंदर्भात ट्विट करून भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हणत सरकारला टोला लगावला आहे. “भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे,” असं राहुल यांनी ट्विट केलं आहे.
Another solid achievement by the BJP government.
Even Pakistan and Afghanistan handled Covid better than India. pic.twitter.com/C2kILrvWUG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 16, 2020
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देऊन एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ग्राफमध्ये करोनाच्या कालावधीमध्ये बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, चीन आणि भूतानच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तर भारताचा जीडीपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक प्रमाणात घसरल्याचे दिसत आहे. या ग्राफमध्ये पुढील वर्षी अफगाणिस्तानचा जीडीपी पाच टक्क्यांनी आणि पाकिस्तानचा जीडीपी केवळ ०.४० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरेल असं या आकडेवारीत सांगितलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’