नवी दिल्ली । इराणने चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून भारताला बाहेर काढलं आहे. जागतिक राजकारणात भारतासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. अशा वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा तिखट शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही”.
मकं प्रकरण आहे तरी काय?
इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. चीनशी झालेल्या या करारानंतर बीजिंग इराणच्या पायाभूत सुविधांशी संबंधित असलेला हा प्रकल्प पूर्ण करेल.
India’s global strategy is in tatters. We are losing power and respect everywhere and GOI has no idea what to do.https://t.co/rEMuMnJhOx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 15, 2020
हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जयदान यांदरम्यान बांधला जाणार आहे आणि भारत यासाठी निधी पुरवणार आहे. गेल्याच आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी या 628 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे उद्घाटन केले होते. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार असून हा प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. आता चीनशी झालेल्या या करारानंतर स्वस्त तेलाच्या बदल्यात हे अडकलेले प्रकल्प चिनी कंपन्यांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
इराण म्हणाला- भारताने साथ दिली नाही
इराणच्या रेल्वे विभागाने म्हटले आहे की, आता ते भारताच्या मदतीशिवाय हा प्रकल्प पुढे नेतील, कारण यापुढे त्यांना हे टाळता येणार नाही. या प्रकल्पासाठी इराणने राष्ट्रीय विकास निधीतून 400 दशलक्ष वापरण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, भारत सरकारची रेल्वे कंपनी, इरकॉन हा प्रकल्प पूर्ण करणार होती. हा प्रकल्प अफगाणिस्तान आणि इतर मध्य आशियाई देशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची भारताची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी होता. यासाठी इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिपक्षीय करार झाला आहे.
अमेरिकेच्या निर्बंधानंतर भारताने घेतली माघार
विशेष म्हणजे, यापूर्वी भारत इराणकडूनच सर्वाधिक कच्चे तेल आयात करीत होता, मात्र अमेरिकेने घातलेल्या निर्बंधानंतर ते कमी करण्यात आले. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौर्यादरम्यान या चाबहार करारावर स्वाक्षरी झाली होती. या संपूर्ण प्रकल्पात सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराण येथे गेले होते, मात्र अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीने भारताने या रेल्वे प्रकल्पाचे काम सुरूच केले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.