हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी केला आहे. राहुल गांधी हे केवळ सत्तेचे राजकारण करत नाहीत, तर जनतेचे राजकारण करतात, अशा नेत्याला देशातील जनता आपोआप सिंहासनावर बसवते अशी स्तुतीसुमने कमलनाथ यांनी उधळली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या इंटरव्हिव्ह मध्ये बोलताना कमलनाथ म्हणाले, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल सांगायचे तर, राहुल गांधी केवळ विरोधकांचाच चेहरा नसतील तर विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील. जगाच्या इतिहासात भारत जोडो सारखी इतकी मोठी पदयात्रा कोणीही काढली नसेल. राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर देशातील जनतेसाठी करतात. तसेच गांधी घराण्याशिवाय इतर कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही असेही कमलनाथ यांनी म्हंटल.
कमलनाथ यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील मोदी विरोधकांनाही नेमकी काय प्रतिक्रिया येते ते आता पाहावं लागेल. मोदी आणि भाजपला हरवण्यासाठी नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, केसीआर हे देशभरातील विरोधक एकत्र तर येत आहेत परंतु पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याबाबत विरोधकांमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही. अशात आता राहुल गांधी याना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून विरोधक स्वीकारणार का हे सुद्धा पाहावं लागेल.