हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा येथे आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा 12 वा दिवस असून शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यभरातून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. त्याच वेळी मनसेकडून राहुल गांधी यांचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या शेगाव येथे होणाऱ्या सभेच्या ठिकाणी जमत त्यांना काळे झेंडे दाखवा असे आदेश दिले आहेत. त्यानंतर आज राज्यभरातून मनसे नेते आणि पदाधिकारी शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, निषेध होणारच, मनसेचं आंदोलन कसं असतं सर्वाना माहिती आहे असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मनसे आम्हाला काळे झेंडे दाखवत असेल तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. त्यामुळे राहुल गांधी vs मनसे असा सामना आता पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल-
सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. येव्हडच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली.