हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला होता. तेव्हा मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. युतीबाबत ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली होती आणि दोघांमध्ये एक तास चर्चा झाली होती,” असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 12 खासदारांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शेवाळे म्हणाले की, 1 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले पक्षासोबत राहू. पण तेव्हा आम्ही सांगितलं भाजपासोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला त्रास होत आहे. त्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपाने तो निर्णय घेतला, तर मी स्वागत करेल. त्यानंतर पुन्हा बैठका झाल्या.
तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचा आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. पण त्यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितले. आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे ठाकरे यांना सांगितले. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले, असा खुलासा शेवाळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला.