सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या जत तालुक्यातील एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह २८ किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा येथील घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची १० किलोची चांदी ताब्यात घेतली, मात्र आरोपी मिळाला नाही.
जत तालुक्यातील लवंगा येथील महादेव सोमलिंग सारगर हा चेन्नई येथील सेमबीयां शहरातील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह या दुकानातून २८ किलोची चांदी घेऊन पोबारा केला होता. चेन्नई पोलीस त्याचा शोध घेत उमदी येथे आले होते.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चेन्नईचे पोलीस पथक व उमदी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी सेमबीयम पोलीस ठाणे, पेरामबुर-चेन्नई यांच्याकडील गुन्ह्यातील आरोपी महादेव सोमलिंग सलगर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी संशयीत आरोपी मिळून आला नाही, परंतु त्याने लपवून ठेवलेली सुमारे चार लाख किंमतीची १० किलो चांदी मिळून आली. या प्रकरणी उमदी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.