हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी ते आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले. यावेळी पत्नी शर्मिली ठाकरे व अमित ठाकरे यांची उपस्थिती होती.
पायाचे दुखणे वाढल्यामुळे राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी आपल्या पुण्यातील सभेतून दिली होती. दरम्यान, आज ते रुग्णालयात दाखल झाले. उद्या (बुधवारी) त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या दुखण्यानं त्रास होत होता. हे दुखणे वाढल्यामुळे आणि वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पायाचे दुखणे वाढल्याने ऑपरेशनच्या एक दिवस अगोदर रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार आज ते दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीयांसह मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांचीही उपस्थिती होती.