हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल सत्तानाट्य संपुष्टात आले असून राज्यात भाजप आणि शिंदे गट यांचं सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र पाठवत त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री देणं ही ही बढती आहे की अवनती ह्यात मी न जाता तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे अस राज ठाकरेंनी म्हंटल.
काय आहे राज ठाकरेंचं पत्र-
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप- मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे