Wednesday, June 7, 2023

मनसे – भाजप युतीबाबत पहिले पाऊल; राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या ‘त्या’ क्लिप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. परंतु आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या त्यांच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजप – मनसे युतीबाबत एक पाऊल पुढे पडलं आहे

काही दिवसांपूर्वी नाशिक येथे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली होती. परप्रांतीयांबाबत आपल्या भूमिकेचा विपर्यास केला जात असल्याचे राज यांनी आपणास सांगितल्याचे त्यावेळी पाटील यांनी नमूद केले होते . त्यानंतर परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेसंबंधीचा गैरसमज दूर करण्यासाठी राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना एका मुलाखतीची लिंक पाठवली आहे.त्यामुळे मनसे- भाजप युती होण्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान राज ठाकरे हे आश्वासक चेहरा आहेत असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची स्तुती केली होती. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.