हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे, गणेश नाईक, छगन भुजबळ यांच्या बंडाशी माझा संबंध लावू नका, मी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी कोणत्या दुसऱ्या पक्षात गेलो नाही तर स्वतः पक्ष स्थापन केला असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एक प्रसंग सांगितला. मुंबईतील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. त्यानंतर जोशी बाहेर गेले आणि फक्त मी आणि बाळासाहेब आम्ही दोघेच होतो. बाळासाहेबांना कळलं हा काही पक्षात राहत नाही. माझी शेवटची भेट होती. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मिठीत घेतले आणि म्हणाले जा…. मी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही, मी तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो आणि नवा पक्ष उभा केला असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन अडीच वर्षां[पासून जे काही राजकारण सुरु आहे ते जनतेसाठी चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा खेळखंडोबा सुरू आहे. यूपी बिहार सारख राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय. सगळा सत्तेचा बाजार झाला आहे. कोण कोणत्या पक्षात मिसळते तेच कळत नाही अस म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.