हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाला यश मिळाले आहे. राज्य सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच, या संबंधित राज्यपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जरांगे पाटलांचे भरभरून कौतुक केले आहे. तर, “आता आरक्षण कधी मिळणार हे देखील सरकारला विचारा, असा सल्ला जरांगे पाटलांना दिला आहे.
राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे आणि कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठा बांधवांना घेऊन आपले आंदोलन मुंबईच्या दिशेने वळवले होते. आज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार होते. मात्र त्या आधीच राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडी घडल्यानंतर चहूबाजूने जरांगे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. यामध्ये राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हणले आहे की, “मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या” त्याचबरोबर, “आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा” असा टोला देखील त्यांनी लगावला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर राज ठाकरे यांनी अंतरवली सराटी गवात जावून त्यांची भेट घेतली होती. तसेच मराठा आंदोलनाला देखील पाठिंबा दर्शवला होता.