हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत झालेली आहे. परंतु तरीदेखील जरांगे पाटील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्यास कळकळीची विनंती केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे”
प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,
सस्नेह जय महाराष्ट्र !
इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 31, 2023
ही माणसं फार निष्ठुर आहेत…
त्याचबरोबर, “तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू” अशी विनंती राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना केली आहे.
राज ठाकरेंची मागणी
इतकेच नव्हे तर, “मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा” अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
पुढे बोलताना राज ठाकरेंनी म्हणले आहे की, समाजा -समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”