हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाक्यांचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. आज याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यावेळी, जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. या चर्चेअंती एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना टोल प्रकरणात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, “ठाणे पासिंग MH 04 च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ” असे देखील सांगितले.
राज्यातील टोल प्रश्नांना घेऊन गेल्या काही दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांनी देखील आक्रमकाची भूमिका घेत “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान आज टोल प्रश्नांना घेउनच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांसंबंधित अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित केले. त्यानंतर, या सर्व मुद्द्यांवर आम्ही सकारात्मक चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.
राज्यातील टोल नाक्यांवर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहून माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी टोलनाक्यासंदर्भातील प्रश्न आणि मुंबईतील पोलिसांच्या घरांबाबतच्या प्रश्नांवर… pic.twitter.com/RnVFJVHnK2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 12, 2023
मुख्य म्हणजे, आज झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी 13 तारखेला टोल मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरेंच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर अधिक माहिती आम्ही देऊ, असे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर, “मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. परंतु या चर्चेनंतर त्यांच्या निर्णयापर्यंत येणे याच्यासाठी म्हणून उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे. त्या बैठकी जो काही निर्णय होईल तो मी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेल. परंतु सध्या मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत.टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन.” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.