हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
राज ठाकरे एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन शरद पवार यांना भेटणार आहेत. आजच सायंकाळी 5:15 ला राज ठाकरे हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शरद पवारांना विनंती करतील. या भेटीकडे सर्वांच लक्ष लागले असून यानंतर तोडगा निघेल का हे पाहावं लागेल.
दरम्यान, कालच एस टी प्रतिनिधी मंडळाने राज ठाकरेंची भेट घेत आपला प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा टाहो एसटी कामगारांनी आज राज ठाकरेंसमोर फोडला. आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं?,” अशा शब्दांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने राज यांच्यासमोर व्यथा मांडली