जयपूर । काँग्रेसने बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजपचे नेते संजय जैन यांची आमदारांच्या खरेदीबाबतची चर्चा असलेली कथित ऑडिओ टेप जारी केली होती. यात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर भाजप नेते संजय जैन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे बंडखोर आमदार भंवरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की, “काही ऑडिओ टेप समोर आल्या आहेत, ज्यात भंवरलाल, संजय जैन आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज आहे. “पैशांची चर्चा झाली आहे,” असं भंवरलाल शर्मा बोलत आहेत. तर “साहेबांना सांगितलं आहे,” असं संजय जैन बोलत आहेत. या टेपमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजप लोकशाहीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात एसओजीमार्फत गुन्हा दाखल करा आणि तपासात दोषी आढळले तर अटक करा, अशी मागणी सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भंवर लाल शर्मा यांनी ही ऑडिओ टेप बनावट असल्याचा दावा केला आहे.
मागील एक महिन्यापासून आमदारांच्या खरेदी-विक्रीचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप करत एसओजीही तपास करत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं. भाजप आमदारांना खरेदी करुन जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी बंडखोर आमदार भवंरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांना पक्षातून निलंबित केलं असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितलं. तसंच पक्षाने सचिन पायलट यांनीही समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरजेवाला म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”