हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलै ला होणार असून त्यादृष्टीने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्याचाच भाग म्हणजे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. लवकरच हे दोन्ही नेते भेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर देण्यात आली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागितल्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
दरम्यान, विरोधी पक्षानी देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक आयोजित केली होती. विरोधकांनी शरद पवारांचे नाव सुचविले होते मात्र पवारांनी त्यास नकार दिला. त्यामुळे विरोधकांकडून कोणाचे नाव समोर येतंय हे सुद्धा पाहावं लागेल.