‘बुधानी वेफर्स’चे मालक राजुशेठ बुधानी यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील सुप्रसिद्ध ‘बुधानी वेफर्स’चे मालक राजुशेठ चमन शेठ बुधानी यांचे मंगळवारी( दि. 6 ) रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. राजूशेठ यांचे मोठे चुलते बाबू यांनी 55 वर्षांपूर्वी महात्मा गांधी रस्त्यावरील पुना ड्रग्स स्टोअर शेजारी छोट्या दुकानात बटाटा वेफर्स विक्री व्यवसाय सुरू केला होता. गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपला व्यवसाय चांगलाच वाढीस नेला आणि ‘बुधानी वेफर्स’ हा पुण्यात ब्रँड तयार झाला.

आज महात्मा गांधी रस्त्यावर बुधानी यांचे तीन मजली इमारती मध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून मोठ्या प्रमाणात बटाटा वेफर्स आणि इतर खाद्य पदार्थांची देखील निर्मिती केली जाते. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशात देखील बुधानी वेफर्सची विक्री केली जाते.

बुधानी यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीही मोठ्या प्रमाणात जोपासली आहे. गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे होता ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट ताजिया कमिटी आणि ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक संस्था आणि संघटनांनी दखल घेऊन त्यांना गौरवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे बुधानी यांचे ‘बटाटा वेफर्स’ उद्योग अशी सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे.

You might also like