हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अगोदरच काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी सुरु आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या विश्वासू अशी ओळख असणाऱ्या खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सभेचे कामकाज सुरु असताना सभागृहाच्या कामकाजाचे रजनी पाटील आपल्या मोबाईलवर चित्रीकरण करत होत्या. हि गोष्ट सभागृहाचे सभापती धनखड यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर चित्रीकरण केल्याबद्दल सभापती धनखड यांनी काँग्रेस खासदार पाटील यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाकरिता निलंबित केले.
सभापतींनी जेव्हा हि कारवाई केली तेव्हा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र, महिला नेत्या म्हणून रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने त्यांना संधी दिली होती. मात्र, सभागृहाच्या कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवणे काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना महागात पडले आहे. परिणामी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.