Tuesday, March 21, 2023

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांना कोरोना; भूमिपूजन सोहळ्यात होते मोदींसोबत

- Advertisement -

मथुरा । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आग्र्याचे सीएमओ आणि इतर डॉक्टर्स पोहोचले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या समर्थकांशी तसेच, मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. याबरोबरच मुख्यमंत्री योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्यगोपाल दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत सूचना केल्या.

- Advertisement -

राम मंदिर भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर होते हजर
गेल्या आठवड्यात ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते. मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”