Ram Mandir Earnings : अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन उद्या म्हणजेच 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांना या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. एकूणच संपूर्ण देशात या उदघाटन सोहळ्यामुळे मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. पण तुम्हाला माहित आहे का?? राम मंदिर हे तीर्थक्षेत्र असलं तरी या मंदिरामुळे उत्तर प्रदेश सरकारला मोठा आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे. राम मंदिरामुळे देशातील पर्यटनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आणि २०२५ मध्ये पर्यटन क्षेत्रामुळे उत्तर प्रदेश सरकारला 20,000 ते 25,000 कोटींपर्यंत कमाई अपेक्षित आहे.
राम मंदिरामुळे उत्तरप्रदेश होणार मालामाल – Ram Mandir Earnings
एसबीआयच्या संशोधकांच्या मते, राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेशला भेट देणाऱ्या देशातील पर्यटकांचा खर्च 2.2 लाख कोटी रुपये होता. तर विदेशी पर्यटकांसाठी 10 हजार कोटी रुपये खर्च (Ram Mandir Earnings) आला. उत्तर प्रदेश राज्यातील पर्यटकांनी केलेला खर्च दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत २०२४ मध्ये दुपटीने वाढू शकतो. तसेच उत्तर प्रदेशच्या चालू आर्थिक वर्षात राज्याचा कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. 2024 च्या अखेरीस राम मंदिर आणि पर्यटनावर भर दिल्याने पर्यटकांचा खर्च 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. यामुळे उत्तर प्रदेशला मोठा फायदा होताना दिसेल .
2028 मध्ये भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि उत्तर प्रदेशचा GDP 500 अब्ज डॉलरच्या पुढे जाईल, असे सुद्धा एसबीआयच्या या अहवालात म्हटले आहे. आत्ता सध्या म्हणजेच 2024 च्या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशचा GDP 24.4 लाख कोटी रुपये म्हणजेच $298 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2028 पर्यंत जीडीपीच्या बाबतीत उत्तरप्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावर पोचेल असेही या रिपोर्ट मध्ये म्हंटल आहे.