हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली येथील संसदेत सुरु असलेल्या राज्यसभेत गोंधळ झाल्याने या ठिकाणी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. त्यावरून देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावरून आरपीआय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आठवले यांनी केली आहे.
राज्यसभेत घडलेल्या धक्काबुक्कीच्या प्रकाराबद्दल केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या खासदारांना निलंबित करा, अशी मागणीही केली. मंत्री आठवले म्हणाले की, राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशना दरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे. संसदेत घातलेल्या प्रकाराबद्दल सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.