सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अजित पवार भाजप सोबत जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. स्वतः अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण देत या बातम्या तथ्यहीन आहेत असं म्हंटल होते मात्र तरीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजितदादांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागल्याने चर्चाना उधाण येतेय. या सर्व घडामोडींवर आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारलं असता अजित दादा जरी भाजपसोबत आले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही असं म्हंटल आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, अजित दादांच्या सारखा नेता आमच्या सोबत (भाजप,शिवसेना, आरपीआय) आला तर आम्हाला आनंदच होईल. पण तरी सुद्धा लगेच अजित दादा मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अशी इच्छा अनेक लोकांच्या आहे पण ती पूर्ण होत नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जागा जास्त मिळवून देखील काँग्रेसच्या हट्टा पायी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळाले होते. त्यावेळेस कदाचित अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असेही आठवलेंनी म्हंटल. मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी लवकर संधी मिळेल असे मला वाटत नाही. अजितदादा बीजेपी मध्ये येऊ शकत नाहीत मात्र सोबत येऊ शकतात. जर अजित दादा बीजेपीत आले तर त्यांचे स्वागतच आहे कारण शरद पवारांच्या तालमीत वाढलेला नेता असल्यामुळे त्यांच्यासारखा नेता मिळाल्यास आनंद होईल. पण जरी ते आमच्यासोबत आले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.