शिवसेनेला मोठा धक्का; रामदास कदम यांच्याकडून नेतेपदाचा राजीनामा

ramdas kadam uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० हुन अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे दिग्गज आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले. असे रॅस्ड कदम म्हणाले.

विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे असे म्हणत रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला.