हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझं वय 70 असून मला आदित्य ठाकरे याना साहेब म्हणावं लागत याची खंत आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी इडियट ठाकरेंवर निशाणा साधला. मी पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणणारे आदित्य ठाकरे भविष्यात माझेच खात घेऊन बसतील हे माहित नव्हतं असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. Tv9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली.
रामदास कदम म्हणाले, माझं वय 70 असूनही मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागत कारण ते ठाकरे आहेत. मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि सांगायचे की, ‘भाई या अधिकाऱ्यांना बोलवात, त्या अधिकाऱ्यांना बोलवा. मिटिंग लावा, सचिवांना बोलवा.’ खरंतर बाहेरच्या माणसाला मंत्रालयात अशाप्रकारे बोलावून मिटिंग लावता येत नाही. पण आदित्य हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने मी तेदेखील केले.
पर्यावरणमंत्री असताना प्लॅस्टिकबंदीचा निर्णय मी घेतला. पण त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांनी घेतले. तेव्हाही मी काही बोललो नाही. पण मला कुठे माहिती होतं की, जे आदित्य ठाकरे आपल्याला काका-काका बोलत आहेत, उद्या तेच माझं खात घेऊन मंत्रालयात बसणार आहेत. मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतकं राजकारण कधीच केलं नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, शरद पवारांनीच डाव साधून शिवसेना फोडली असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आजारी असल्याने घरी होते. तर दुसरीकडे अजित पवारांना प्रशासकीय अनुभव जास्त असल्याने त्यांनी त्याचा वापर करून शिवसेना फोडली. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी लुटला असा घणाघात रामदास कदम यांनी केला. आज आपण सर्वांनी उभी केलेली शिवसेना कोसळताना पाहून दुःख वाटत अस म्हणत रामदास कदम ढसाढसा रडू लागले. आपण भगवा कधीही सोडणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असेही रामदास कदम म्हणाले.