फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार? रणजितसिंह निंबाळकरांनी दिली महत्वाची माहिती

Pandharpur Phaltan Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फलटण ते पंढरपूर (Pandharpur Phaltan Railway) असा रेल्वेमार्ग महारेल द्वारे पुर्ण न करता रेल्वे मंत्रालयामार्फत पुर्ण करण्यासाठीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून राखडलेल्या ह्या रेल्वेमार्गाचे पांग फिटणार अशी आशा पुन्हा पुनर्जिवीत होताना दिसून येत आहे. आणि आता फलटण ते पंढरपूर असा 105 km चा रेल्वेमार्ग पुढील एक ते दीड वर्षात पुर्ण करण्यात येईल असा दावा भाजप नेते आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsingh Nimbalkar) यांनी केला आहे.

राज्य मंत्रीमंडळाने फलटण ते पंढरपूर मार्गासाठीची अडचण दूर करून हा महामार्ग त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पूर्ततेसाठी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राज्यमंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबरीने फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम पुर्णपणे नवीन असल्याने याबाबत महारेलला नवीन रेल्वेमार्ग बांधणीचा तितकासाअनुभव नसल्याचेही त्यांनी सांगितले . रेल्वे विभागाकडे हा रेल्वेमार्ग दिल्यामुळे काम अधिक जलद गतीने पुर्ण होणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाची तयारी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले .

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सुरवातीपासून या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा  केला होता. पाठपुरावानुसार 2018 मध्येच सरकारने रेल्वेमार्ग पुर्ण करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले होते. राज्य सरकार व केंद्र सरकार प्रत्येकी 50% वाटा उचलणार  असे ठरले होते. खासदार रणजित निंबाळकर यांच्या दाव्यानुसार जानेवारी 2024 मध्ये कामाला सुरुवात होईल. त्यानंतर पुढील अवघ्या 12 ते 14 महिन्यात हा रेल्वेमार्ग पुर्ण बांधून तयार असेल.

संपूर्ण रेल्वेमार्गाच्या बांधणीसाठी 1482 कोटी रुपये निधी आवश्यक असून यापैकी 921 कोटी रुपये राज्य सरकार टप्प्याटप्याने देणार आहे. रेल्वेमार्गसाठी आवश्यक भुसंपादन ब्रिटिशांनी पुर्ण केलेले आहे. तसेच या मार्गात कुठल्याही डोंगरदऱ्या नसल्याने खर्च कमी  लागणार आहे. मात्र या मार्गात बरीच नवीन बांधकामे असल्याने ती हटवण्यासाठी डोकेदुखी निर्माण होउ शकते . हा रेल्वेमार्ग फलटण ,निम्बलक, नातेपुते , माळशिरस , वेळापूर , भंडीशेगाव , वाखरी आणि पंढरपूर असा असणार आहे. भविष्यात या रेल्वेमार्गामुळे या भागात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.