नवी दिल्ली । अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, जिथे तालिबान आणि सरकारी सैन्य दलांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. तालिबान्यांनी देशाच्या बाहेरील भागांवर कब्जा केला आहे आणि आता ते प्रांतीय राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, तालिबानने एकतर अफगाणिस्तानचा 80 टक्के भाग काबीज केला आहे किंवा त्यासाठी युद्ध सुरू आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तेथील परिस्थिती बिघडली आहे. आता अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशीद खान याने आपल्या देशातील लोकांसाठी जागतिक नेत्यांना एक भावपूर्ण आवाहन केले आहे.
22 वर्षीय स्टार फिरकीपटू रशीदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की,”जगाचे नेते, माझा देश संकटात आहे. मुले आणि महिलांसह हजारो निरपराध लोकं दररोज शहीद होत आहेत, घरे आणि मालमत्ता नष्ट होत आहेत.”
भारताच्या आयपीएल, पाकिस्तानच्या पीएसएल, ऑस्ट्रेलियाच्या बीबीएलसह जगभरातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये खेळलेल्या या लेग स्पिनरने पुढे लिहिले की, लोकांना शांतता हवी आहे. रशीदने लिहिले,” या हल्ल्यांमुळे हजारो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. आम्हाला अडचणीत सोडू नका. अफगाणांना मारणे थांबवा आणि अफगाणिस्तानला नष्ट करू नका. आम्हाला शांतता हवी आहे.”
अफगाण सरकारी सैन्य आणि तालिबान यांच्यातील युद्धाने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत आणि मोठ्या संख्येने मुले आणि महिलांना लक्ष्य केले गेले आहे. मुलांना जबरदस्तीने सशस्त्र संघटनांमध्ये भरती केले जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनिसेफचे प्रतिनिधी हर्वे लुडोविच यांनी निवेदनात म्हटले आहे की,”गेल्या 72 तासांत अफगाणिस्तानमध्ये 20 मुलांचा मृत्यू झाला आहे आणि 130 जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, UNHCR च्या मते, गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये 35,000 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.