हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघ्या काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका आल्यामुळे महाविकास आघाडी जागावाटपासंदर्भात काथ्याकूट सुरू झाली आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मुख्य गट आहेत. यामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान करत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला आहे.
आज संजय राऊत यांनी जागा वाटपांसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वंचितकडून करण्यात आलेल्या बारा जागांच्या मागणीबद्दल देखील प्रश्न विचारला गेला. यावर ते म्हणाले की, जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे हे आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील सांगितले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलीही ओढाताण नाही. तसेच पुढेही ती होणार नाही. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल.
त्याचबरोबर, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या भूमिकेबाबत एकमत आहे. तसेच याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं एकमत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचीही त्याला मान्यता आहे, या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात आहोत” असे संजय राऊत म्हणाले.
इतकेच नव्हे तर, “वंचित बहुजन आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले, तर हा देश हुकूमशाहीच्या खाईत ढकलला जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हा देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, या संविधानाचं महत्त्व त्यांना सर्वाधिक माहिती आहे.” असे देखील राऊत यांनी म्हटले.