पुणे प्रतिनिधी | भाजपला रोखायचे या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली. या मैत्रीच्या अध्यायात अनेक सकारात्मक घटना घडत गेल्या. पण आता प्रत्यक्ष एकादिलाने लढण्याची वेळ आल्यावर मात्र त्या मैत्रीची बिघाडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानीला फक्त एक जागा देणार असे सांगितले जात आहे तर स्वाभिमानाला तीन जागा हव्या आहेत. दोन जागांसाठी मैत्री तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर रोज इशारे देत आहेत मात्र या इशाऱ्यांचा या दोन्ही पक्षावर काहीही परिणाम होताना दिसत नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी माढा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबत स्वाभिमानीच्या निवडक नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत काहींनी खूप आक्रमक भूमिका मांडली. ‘आपल्यामुळे त्यांचा फायदा की त्यांच्यामुळे आपला फायदा असा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी भाजपचा वारू गतीने सुटला होता तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले विरोधकांची भूमिका बजावत नव्हते तेव्हा स्वाभिमानी भाजपच्या विरोधात लढत होती. पण आता मात्र भाजपच्या विरोधी वातावरण तयार झाले म्हणून स्वाभिमानाला डावलले जात आहे. आपल्याला डावलले जात असेल तर आपण ताकद दाखवून देऊ.”असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला.याच बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.
काँग्रेससोबतच्या आगामी आघाडीबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी २७ आणि २८ फेब्रुवारीला पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली असून या बैठकीत आघाडीकडून तीन जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे वृत्त आहे.