हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने व्याख्यानाचं आयायोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला NDTV चे संपादक रवीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ दाभोलकरांच्या खुनानंतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं, यंदा मात्र ऑनलाईन का होईना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसती तर मनात खंत राहिली असती असं म्हणत रवीश कुमार यांनी भारतीय लोकशाहीचं भविष्य या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं.
२१ वर्षीय दिशा रवी हिला केलेली अटक, संविधानिक अधिकारांची होत असलेली गळचेपी यावर रवीश कुमारांनी लक्ष वेधलं. शेतकरी आंदोलनाच्या व्यापकतेची माहिती देताना ज्या घरातील एक माणूस सैन्यात काम करतोय त्याच घरातील शेतकरी दिल्लीत आंदोलनासाठी येत असेल तर तो दहशतवादी कसा हा सवाल रवीश यांनी उपस्थित केला. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलेलं, आंदोलन केलेलं अजिबातही रुचत नसून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ते चिरडण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे. संविधानात नागरिकांची हक्क आणि कर्तव्य नियोजनबद्ध पद्धतीने दिली आहेत. मात्र बहुमताचा रेटा वापरून याच कर्तव्यांना देशद्रोही म्हणण्याचं काम विद्यमान सरकारकडून सुरु आहे.
एखाद्या सत्ताधारी खासदाराला निवडून देणारे लोक निवडणुकीवेळी चांगले, आणि आंदोलन केलं की दहशतवादी असं कसं असू शकतं ? पंतप्रधान नरेंद्र मोदी तर लोकशाहीचा डांगोरा पिटत असताना लोकांच्या म्हणण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये अधिकारांचं वितरण असलं तरी यात लोकांचं म्हणणं कुठंही विचारात घेतलं जात नाही. संसदेच्या स्वरूपाने असलेली लोकशाहीची रचनाच मनमानी कारभाराने मोडकळीस आणली जात असल्याची चिंता रवीश कुमार यांनी व्यक्त केली. २०१४ नंतर टीव्हीमध्ये दिसणाऱ्या बातम्यांच्या चॅनेलचं, त्यातील कार्यक्रमांचं बदललेलं स्वरूप हे कधीच लोकांच्या बाजूने राहिलेलं नाही. विरोधी पक्ष नाहीच असं जनतेच्या मनात ठसवून लोकांच्या मनातील लोकशाही मूल्य नष्ट करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. संसदेतील सदस्यांच्या सहभागाशिवाय कायदे मंजूर होतातच कसे हेसुद्धा विचारायची सोय आता राहिलेली नाही.
भारतासारख्या मोठ्या देशात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सोडता कुठेही लोकांची, लोकांसाठी असलेली लोकशाही दिसून येत नाही. निवडणूक आयोगाचं नामोनिशाणही येत्या काळात राहणार नाही असंच चित्र सध्या निर्माण झालं आहे. न्यायपालिकेत, प्रशासनात सहभागी असलेल्या काही संवेदनशील लोकांना याबद्दल जाणीव होत असून हा बदल आश्वासक असल्याचंही रवीश कुमार पुढे म्हणाले.
प्रत्येक चुकीची गोष्ट झाकण्यासाठी देवाचा आधार मोदी-शहा घेत असून कोणताही प्रश्न विचारला की राम आणि कृष्णाचा आधार कशाला लागतो असा सवाल रवीश कुमारांनी उपस्थित केला. देशातील उच्चशिक्षित आणि प्रश्न विचारणारे तरुण-तरुणी असोत, किंवा मुस्लिम युवक-युवती, तुम्हाला देशद्रोही ठरवण्यासाठी आता कोणतीही विशेष गोष्ट घडण्याची वाट पाहावी लागत नाही. पत्रकारांच्या जामिनासाठी करावी लागणारी धडपड देशाने पाहिली आहे. संविधानाचं महत्व ओळखून त्यावर काम करणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. संविधान निर्मात्यावर गाणीही तयार करणारे लोक या देशात आहेत. पण मग संविधानिक अधिकारांची गळचेपी होत असताना हे लोक पुढे का येत नाहीत? असा खेदजनक सवालही रवीश कुमार यांनी आजच्या कार्यक्रमात विचारला.
धार्मिक ओळख निर्माण करताना कृष्णाच्या नावाखाली दुर्योधनांची फौज तयार करण्याचं काम भारतीय माध्यमांकडून केलं जात आहे. भारतीय समाज जोपर्यंत भारतीय माध्यमांची धार्मिक गुलामगिरी ओळखणार नाही तोपर्यंत भारतीय पत्रकारिता लोकशाहीला मदत करू शकणार नाही असं परखड मतही रवीशकुमार यांनी व्यक्त केलं. देशातील ४-६ पत्रकारांच्या प्रामाणिकपणावर देशातील लोकशाही व्यवस्थेची धुरा सध्याच्या काळात टिकून असून आपल्या सर्वांची साथ मिळाली तरच देशातील वाढत्या ध्रुवीकरणावर, वाढत्या विद्वेषावर मात करता येईल असा आशावादही रवीशकुमार यांनी भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार कुमार केतकर, कॉ. मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर, ऍड. अभय नेवगी, डॉ.हमीद दाभोलकर यांचीही उपस्थिती होती.