हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत मध्यमवर्गीय आणि सूक्ष्म वित्त कंपन्यांना (NBFC) मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी बँकेने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटची कपात करून कर्जदारांना थोडा दिलासा मिळाला होता. आता मात्र आरबीआयने बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावर असलेले जोखीम वजन (Risk Weight) कमी करून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
बँकांना मिळणार अधिक निधी
या नव्या निर्णयामुळे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि अल्प रक्कम कर्ज (Microfinance Loans) देणाऱ्या संस्थांना मोठा फायदा होणार आहे. बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांवर असलेल्या जोखमीचे वजन कमी केल्यामुळे बँकांना अधिक निधी उपलब्ध होईल आणि त्यामुळे कर्जवाटपाला गती मिळेल. परिणामी, मध्यमवर्गीय आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी कर्ज घेणे सोपे होणार आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये आरबीआयने कर्ज देण्याचे नियम कडक करत ग्राहक कर्जांवरील जोखीम वजन १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. यामुळे NBFC आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया कठीण झाली होती. मात्र, नव्या निर्णयानुसार, ग्राहक कर्जांप्रमाणेच मायक्रोफायनान्स कर्जांवरही आता १०० टक्के जोखीम वजन लागू करण्यात आले आहे.
कर्जदारांसाठी दिलासा
महत्वाचे म्हणजे, जोखीम वजन कमी झाल्याने बँकांना कमी प्रमाणात निधी राखीव ठेवावा लागेल. त्यामुळे त्यांच्या कर्ज वितरण क्षमतेत वाढ होईल आणि ग्राहकांसाठी कर्ज सुलभ व परवडणारे होईल. शिक्षण, वाहन, घर आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी घेतलेले कर्ज आधीच या कठोर नियमांमधून वगळण्यात आले होते. आता मायक्रोफायनान्स कर्जांनाही त्याच धर्तीवर सवलत देण्यात आली आहे.
तसेच, या निर्णयामुळे खासकरून प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) आणि स्थानिक क्षेत्र बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. या कर्जांवर १०० टक्के जोखीम वजन लागू करण्यात आले आहे. त्यासाठी बँकांनी योग्य धोरणे आणि कार्यपद्धती ठरवाव्यात, असा स्पष्ट निर्देश आरबीआयने दिला आहे.
दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांसाठी गृहकर्ज, वाहन कर्ज आणि सूक्ष्म वित्तीय कर्ज घेणे सोपे होणार आहे. तसेच, आर्थिक स्थिरतेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयामुळे कर्जाचे हप्ते काही प्रमाणात कमी होतील, यामुळे सामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.







