हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू धर्मात गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. मात्र कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे.
अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.
१) पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या प्रयत्नात आपण आपलाही सहभाग नोंदवायला हवा. त्यामुळे आपण यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा.
२) पर्यावरणाचे रक्षण करण्याची शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून आपण गणेशोत्सव दरम्यान आपला परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
३) कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो. त्यामुळे चांगला बदल घडवायचा असेल तर उशीर कशाला यंदा तुम्ही तुमच्या घरी जो गणपती आणणार आहात तो शाडूच्या मातीचा आणा. त्यामुळे गणपती विसर्जनानंतर तो पाण्यात सहज विरघळेल.
४) लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे महत्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह धरा.
५) गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.