व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जालन्यातुन राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले तुम्ही विरोधी पक्षात असता तर….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) जालन्यात आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ज्यांनी तुमच्यावर लाठीमार केला त्यांना मराठवाड्यात बंदी घाला असं आवाहन राज ठाकरेंनी केलं तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणतात या घटनेची कोणी राजकारण करू नये, पण जर तुम्ही विरोधी पक्षात असता तर तुम्ही पण हेच केलं असत असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप विरोधातील आपले इरादे स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी यापूर्वीच सांगितलं होते. आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय नेते फक्त तुमची मत मागतात. सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतात आणि नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष्य करतात. मराठा आरक्षण हा सुप्रीम कोर्टातील तिढा आहे, पण हे राजकारणी तुम्हाला आरक्षणाचे अमिश दाखवून मग सत्तेत येतात. एकदा हे सत्तेत, एकदा ते सत्तेत… विरोधी पक्षात असताना अमिश दाखवणार आणि सत्तेत आली कि गोळ्यांचं झडणार असं म्हणत राज ठाकरेंनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांवरही जोरदार टीका केली.

तुम्ही पोलिसाना दोष देऊ नका, त्यांना ज्यांनी आदेश दिले त्यांना दोष द्या. ज्यांनी तुमच्यावर लाठीहल्ला केला त्यांना मराठवाड्यात बंदी घाला, त्यांना इकडे पाऊल ठेऊन देऊ नका असं राज ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, झालेल्या गोष्टीचे कोणी राजकारण करू नये. पण हेच फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर त्यांनीही राजकारणच केलं असत ना? असा सवाल करत राज ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवायचा पूर्ण प्रयत्न करेन. कसा मार्ग निघतोय ते आपण पाहू. इतर नेत्यांसारखी खोटी आश्वासने मी देणार नाही. मी तज्ज्ञांशी बोलेन, चर्चा करेन आणि जर हा विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित आपण तो सोडवू पण आपला जीव गमावू नका असं राज ठाकरे यांनी म्हंटल.