हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही असा स्पष्ट इशारा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला.
संजय गायकवाड म्हणाले, किरीट सोमय्यांनी असं समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज त्यांनी करून घेऊ नये. यापुढे सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंबद्दल असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला.
किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले होते?
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर एक ट्वीट केले. ‘मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.’ अस ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. येवडच नव्हे तर त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणाऱ्याला माफियाच म्हणणार अस सोमय्या म्हणाले.