सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच अपेक्षेप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजप पक्षाला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत असल्याने, पक्षातील गटबाजीने जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे.
जत मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपमध्ये जगताप यांचा आणि जुने भाजपनेत्यांचा असे दोन गट निर्माण झाले होते. पुढे हे गट कायम राहिले. आता विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट एकमेकांविरोधात सक्रीय झाले असल्याचे पहायला मिळत आहे. आमदार जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, जगताप यांच्या जागी नवीन उमदेवार द्यावा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे.
त्यामुळे निवडणुकीपूर्वीच जत मतदारसंघात भाजपमध्ये आमदार जगताप यांचा एक गट व जुना भाजप गट अशी विभागणी झाली आहे. मागील साडेचार वर्षात आमदार विलासराव जगताप यांना जत तालुक्यातील विकासकामांसळ पाणी योजनांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. त्यांचा लोकांशीही संपर्क कमी झाला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत, त्यामुळे त्यांना भाजप उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:ची उमेदवारी घोषित केली आहे, अशी टीका जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौंडा रवि-पाटील व जत भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी यांनी सांगलीत केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
जगताप यांना विरोध होत असला तरीही, जगताप यांनी पक्षातील आपली पकड मजबूत करून ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे यांच्यातील वाद मिटविण्यात जगताप यांच्या मोठा वाटा होता. तर जत तालुक्यातून लोकसभेत भाजपला २५ हजाराचे मताधिक्या सुद्धा मिळवून देण्याचे काम जगताप यांनी केले होते. त्यामुळे भाजपकडून त्यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र उमदेवारी मिळून ही पक्षातील विरोधकांची नाराजी दूर करणे जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.