सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकाच वेळी तब्बल 23 गुंडांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले आहे. ही तडीपारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे.. यामध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दमदाटी, मारामारी, दगडफेक, जाळपोळ, सावकारी, खंडणी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 11 जणांच्या टोळीला सातारा- सांगली जिल्ह्यातून तसेच शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. दुसरी टोळी ही कराडमधीलच आहे, तर तिसरी टोळी साताऱ्यातील आहे. या टोळीला 1 वर्षासाठी तडीपार केलं असल्याने पोलिसांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
टोळी प्रमुख विशाल घोडके (वय- 29, शनिवार पेठ, कराड), गणेश वायदंडे (बुधवार पेठ, कराड), सोन्या निलेश लोखंडे (वय- 27, रा. गुरुवार पेठ कराड), शुभम सुनील जाधव (रा. बुधवार पेठ, कराड), आदित्य मदन घाडगे (वय- 24, रा. शुक्रवार पेठ कराड), बजरंग सुरेश माने (वय- 20, रा. बुधवार पेठ कराड), पवन सुनील भोसले (वय-21, रा. बुधवार पेठ कराड), सत्यजित गोरख सूर्यवंशी (वय-23, रा. शिक्षक कॉलनी शनिवार पेठ कराड), योगेश दादा भोसले (वय- 20, रा. बुधवार पेठ कराड), प्रतीक विजय साठे (वय- 28, रा. बुधवार पेठ कराड) संकेत राजे डांगे (वय- 23, रा. शुक्रवार पेठ कराड) या 11 इसमांना हद्दपार करण्याचे आदेश अजय कुमार बंसल यांनी दिले कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. या 11 जणांना सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव या तालुक्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार केले आहे.
कराड शहराच्या हद्दीत चोरी सरकारी कामात अडथळा गर्दी मारामारी दगडफेक खंडणी विनयभंग इत्यादी गंभीर गुन्हे करणाऱ्या कुंदन जालिंदर कराडकर (वय- 27, रा. सैदापूर ता. कराड) या टोळी प्रमुखांसह अर्जुन यशवंत कुंभार (शनिवार पेठ, कराड), अभिजीत संजय पाटोळे (वय- 22, रा. बुधवार पेठ कराड) या तिघांविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपारीचे प्रस्ताव सादर केला होता. या तिघांना संपूर्ण सातारा जिल्हा व लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव या तालुका हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
सातारा शहरातील खंडणी दारूविक्री दरोडा तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये जयसिंग जनार्धन कांबळे (वय- 34, रा. प्रतापसिंह नगरखेड सातारा) या टोळी प्रमुखांसह अजय देवराम राठोड (वय- 29), तानाजी सावंत (वय-18), अजय जाधव (वय- 22), ऋत्विक अजय जाधव (वय- 19), गणेश विलास चव्हाण (रा. लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा) यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सादर केला होता. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सगळ्यांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
याशिवाय उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत शिवीगाळ दमदाटी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घरफोडी गंभीर शारीरिक दुखापती यासारखे गंभीर गुन्हे करणारे डुबऱ्या सुनील पाटील (वय- 22) या टोळी प्रमुखांसह समीर मनेर (वय- 30), सोहेल सलीम मोमिन (वय- 30, सर्वजण रा. उंब्रज, ता. कराड) यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस ठाणे अजय गोरड यांनी सादर केला होता. या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव तालुका हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश अजय कुमार बंसल यांनी दिले आहेत.
या हद्दपार प्राधिकरणात सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक मधुकर गुरव, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य सहकार्य करून कागदोपत्री पुरावे सादर केले.