औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील ४३ केंद्रावर शुक्रवारी (ता. ३०) गर्दी केली. काल दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. परंतु आज शनिवारी (ता. ३१) मात्र ४३ केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे. एका दिवसात १० हजार नागरिकांचे लसीकरण करणे हा एक विक्रमच आहे.
कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा होता. असे असतानाच महापालिकेला बुधवारी (ता. २८) रात्री २१ हजार लसी मिळाल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी लसीकरण झाले. शुक्रवारी ४३ केंद्रांवर सोय करण्यात आली होती. यापूर्वी दुसऱ्या डोससाठी जास्तीत तर पहिल्या डोससाठी केवळ पाच केंद्रांवर लस दिली जात होती. पण शुक्रवारी पहिला व दुसरा डोस एकाच केंद्रावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली. दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. दरम्यान कोविन पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लसीकरण बंद पडले होते.
त्यामुळे सायंकाळी चारऐवजी सहा वाजेपर्यंत लसीकरण केल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेकडे चार हजार ३०० लसी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे शनिवार ४३ केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे. त्यात कोवॅक्सिन लसीचे तीन तर ड्राइव्ह इनसाठी एक केंद्र असेल.