हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता आणली जावी अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १ ऑगस्टपासून 25 जिल्ह्यात निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
टोपे पुढे म्हणाले की, अजूनही धोका टळलेला नाही. दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. या लाटेशी दोन हात करण्यासाठी राहय सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असून लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध शिथील केले जाणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.