हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच वानखेडेंनी जुनी कागदपत्रे नष्ट करुन नवे प्रमाणपत्र बनवले आहे. मुंबई महानगरपालिकेत सगळी माहिती असून माझ्याकडे त्यांच्या शाळेचा दाखला, शाळेत दाखल होण्याचा फॉर्म असे अनेक कागदपत्र असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे. तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला 27 जून 1986चा आहे. त्यातही वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचं दिसून येत आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, समीर वानखेडे यांनी १९९३ मध्ये खऱ्या कागदपत्रांमध्ये खोडाखोड करुन नवीन दाखले काढले. यामध्ये त्यांनी जुने रिकॉर्ड देखील नष्ट केले पंरतु ते विसरले की महानगरपालिकेतील सर्व कागदपत्र स्कॅन करुन ठेवले आहेत. त्यामुळे ते अजूनही आहेत. कोणीही कम्प्यूटरमधून काढून घेऊ शकतात असे नवाब मलिक म्हणाले