चंदेरी दुनिया । समीर गायकवाड
आज गुरुदत्त यांचा स्मृतिदिन. हॅलो महाराष्ट्रचे अतिथी लेखक समीर गायकवाड यांनी त्यांच्या ब्लॉगवर मागे लिहिलेल्या निवडक लेखनात गुरुदत्त यांच्याविषयीच्या काही आठवणी सापडल्या. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी त्या आठवणी जाग्या करून देत आहोत.
हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोण असं होत. १९५० आणि १९६० च्या दशकात त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मेजवानी आपल्या अभिनयकौशल्यातून रसिकांना दिली. १९५३ साली गीता रॉय चौधरी या पार्श्वगायिकेशी त्यांनी विवाह केला. प्यासा, कागज के फुल, साहब, बिबी और गुलाम, चौदवी का चांद या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती होत्या. २०१० साली ‘सीएनएन’ने गुरुदत्त यांचा आशिया खंडातील सर्वात प्रभावी २५ अभिनेत्यांमध्ये समावेश केला. टाईम्स नियतकालिकाने ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या चित्रपटांचा समावेश सार्वकालिक १०० महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये केला. गुरुदत्त यांचं निधन १० ऑक्टोबर १९६४ रोजी झालं. हॅलो महाराष्ट्र परिवारातर्फे गुरुदत्त यांना विनम्र अभिवादन.
गुरुदत्तनी ‘प्यासा’च्या चित्रिकरणाच्या सुरुवातीच्या दिवसांतच निर्णय घेतला होता, की शक्यतो सिनेमाची सर्व लोकेशन्स वास्तविक असतील. यातले एक गाणं खरोखरच्या कोठ्यावर आधारित प्रसंगामधलं होतं. गुरुदत्तनी फर्मावलं की खरयाखुऱ्या कोठ्यावर जाऊन गाणं चित्रित करायचे ! परंतु एकच अडचण होती. दत्त स्वतःच कधीच कोठ्यावर गेलेले नव्हते त्यामुळे अख्खं युनिट घेऊन तिथे जाणे हे जिकीरीचे काम होते. तोवर गाण्याच्या संदर्भातील एका दृश्यासाठी तात्पुरते लोकेशन निवडले गेले. शुटींगची सगळी यंत्रणा आणि तंत्रज्ञ तिथे पोहोचले. गाण्याच्या सीनच्या काही रिहर्सल देखील तिथेच पार पडल्या.
इकडे स्वतः गुरुदत्त काही झाले तरी कोठ्यावर जायचेच आणि आपल्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी एखादा आयडियल स्पॉट मिळतो का याचा वेध घ्यायचाच या इराद्याने आपल्या मित्रासह एका कोठ्यावर गेले. आपल्या विचारांशी ठाम असणारे गुरुदत्त जेंव्हा तिथे गेले तेंव्हा तिथले दृश्य पाहताच विलक्षण हैराण झाले. कोठ्यावर नाचणारी तरुणी जवळपास सात महिन्यांची गर्भवती होती. तरीदेखील लोक तिचा नाच पाहत होते. ती अगतिक होऊन नाचत होती आणि लोक तिच्यावर दौलतजादा करत होते. गुरुदत्त हे पाहून आपल्या मित्राला निर्वाणीचे चार शब्द सुनावून तिथून उठून गेले. जाताना त्यांच्या हातातली नोटांचे बडंलं त्यांनी तिथेच ठेवली.
या घटनेनंतर गुरुदत्तनी त्यांच्या शुटींग युनिटला तडकाफडकी कळवले की, ‘प्यासा’ मधील साहिरच्या ‘त्या’ गाण्यासाठी मला कुंटणखाण्याचा एक बेमिसाल सीन मिळाला आहे. ‘अखेर मनात योजल्याप्रमाणे गुरुदत्तनी ते गाणं तशाच पद्धतीने त्याच लोकेशनवर चित्रित केले…काही महिन्यात सिनेमा पूर्ण झाला देखील…१९ फेब्रुवारी १९५७ ला ‘प्यासा’ रिलीज झाला आणि त्याने इतिहास घडवला. गुरुदत्तजींचे नाव हिंदी सिनेमात अजरामर झाले…
‘प्यासा’मधील ज्या गाण्याची ही कथा आहे, हेच ते अप्रतिम गाणे –
‘ये कूचे, ये… हं ऽऽऽ , घर दिलकशी के ये कूचे, ये नीलाम घर दिलकशी के
ये लुटते हुए कारवां ज़िंदगी के कहाँ हैं, कहाँ हैं मुहाफ़िज़ खुदी के
जिन्हें नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं
ये पुरपेंच गलियां, ये बदनाम बाज़ार l ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार
ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार जिन्हे नाज़ …
ये सदियों से बेखौफ़ सहमी सी गलियां l ये मसली हुई अधखिली ज़र्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियाँ l जिन्हे नाज़ …
वो उजले दरीचों में पायल की छन छन l थकी हारी सांसों पे तबले की धन धन
ये बेरूह कमरों मे खांसी कि ठन ठन l जिन्हे नाज़ …
ये फूलों के गजरे, ये पीकों के छींटे l ये बेबाक नज़रे, ये गुस्ताख फ़िक़रे
ये ढलके बदन और ये बीमार चेहरे l जिन्हे नाज़ …
यहाँ पीर भी आ चुके हैं, जवां भी l तन\-ओ\-मन्द बेटे भी, अब्बा मियाँ भी
ये बीवी है और बहन है, माँ है l जिन्हे नाज़ …
मदद चाहती है ये हवा की बेटी l यशोदा की हमजिन्स राधा की बेटी
पयम्बर की उम्मत ज़ुलेखा की बेटी, l जिन्हे नाज़ …
ज़रा इस मुल्क के रहबरों को बुलाओ l ये कूचे ये गलियां ये मंज़र दिखाओ
जिन्हें नाज़ है हिंद पर उनको लाओ l जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं …..
रेडलाईट एरियात काम करताना हे गाणं डोक्यात खिळे ठोकल्यासारखे गच्च रुतून बसले आहे. हे गाणं लिहिणारे साहीर, आपल्या अप्रतिम स्वरात हे गाणं गाणारे रफी, या गाण्यावर अत्यंत उत्कट अभिनय करणारे गुरुदत्त, अन गुरुदत्तजींचा नितांतसुंदर ‘प्यासा’ काही केल्या काळजातून जात नाहीत..भलेही या सिनेमानंतरच्या दोन दशकानंतर मी जन्मलो असलो तरीही हा सिनेमा अन त्यातलं हे भावोत्कट गाणं जवळचे वाटते. अगदी काल परवाचे वाटते.