औरंगाबाद – दुबईला मित्रांसोबत गेलेला आणि कोरोनाबाधित झालेल्या सिडको एन-7 भागातील तरुणाच्या आई, वडील आणि पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
सिडको एन 7 परिसरातील 33 वर्षीय तरुण हा मित्रांसोबत दुबईला गेला होता. दुबई येथून 16 डिसेंबरला तो शहरात आला. त्याला सर्दी, ताप असल्याने त्याने दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह निघाला. त्याच्या घरात आई, वडील, पत्नी, लहान मुलं असल्याने त्यांच्या संपर्कात न येताच तो तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. 23 डिसेंबर रोजी तो खासगी रुग्णालयातून सुटी घेऊन घरातच विलगीकरण कक्षात राहिला.
शनिवारी त्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या मध्ये कोणतेही लक्षणे दिसून येत नसले तरी त्यास तातडीने मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्या तरुणाच्या घरातील आई, वडील आणि पत्नीची महापालिकेच्या पथकाने कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली. या चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.