सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी स्वागत केले.कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णाचे मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. अरूण पाटील याावेळी उपस्थित होते.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेला हा मास्क पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली जीवाणूंच्या म्हणजेच बॅक्टेरिया च्या वाढीस प्रतिबंध करणारा तसेच विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा म्हणजेच अँटीव्हायरल अशा वैशिष्टपूर्ण असून वापरण्यास अधिक सोयीस्कर आहे, चार थरांचे हे मास्क वजनाने अत्यंत हलके असून या मास्कच्या योग्य वापराने नागरिक संसर्गापासून दूर राहू शकतील.
या मास्क मध्ये मनमोहक सुगंध देणारे हरबल आणि न्यानो कोटेड फिल्टर बसवण्याची सोय करून देण्यात आली आहे. दररोज बदलणे योग्य असणारे चार फिल्टर हे या मास्कसोबत ग्राहकांना दिले जाणार आहे. हे फिल्टर काढून मास्क धुतल्यास या फिल्टरचा सुगंध दहा दिवस टिकून राहतो, हा मास्क बायोडिग्रेडेबल अशा कापडापासून आणि पोली प्रोफाइल सामग्रीचा वापर न करता 100 टक्के सुती कपडा पासून बनवण्यात आला असल्याने, श्वास घेताना अडचण वाटत नाही, शिवाय सातत्यपूर्ण वापरामुळे अस्वस्थपणा देखील वाटत नाही. मुख्य म्हणजे हे मास्क रोज कोणतेही प्रकारच्या डिटर्जंट पावडर मध्ये धुऊन पुन्हा वापरण्यायोग्य बनवला गेल्याने तो नागरिकांना दीर्घकाळ वापरणे शक्य आहे. सर्वसाधारणपणे कमीत कमी 90 वॉशिंग सायकल या मास्कसाठी निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच रोज धुवून वापरल्यास तो किमान तीन महिने प्रभावीपणे वापरणे शक्य होईल.
‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी मोठे योगदान दिले आहे, सध्या मास्कची प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती करण्यात येत असून, पुढील आठवड्यापासून तो माफक दरात बाजारपेठेतही उपलब्ध करून देण्याचा मनोदय विद्यापीठाने व्यक्त केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला किफायतशीर खर्चात अधिक प्रभावीपणे स्वतःचे आरोग्य जपता यावे या, उद्देशाने संशोधित करण्यात आलेल्या या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. के बायो मास्कच्या टिकाऊपणा मुळे हा मास्क वापरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन अवघा एक रुपया खर्च येणार आहे, त्यामुळे हा मास्क नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे.
डॉ. श्रद्धा बहुलेकर यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले.