हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या हाताला लागत आहे तर काही ठिकाणी नाही. कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथील सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्यात चोरटयांनी चोरी केली. यामध्ये दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेली. संबंधित पोलीस अधिकारी नाईकबा यात्रेला गेले होते. यावेळी हि घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त पोलिस सुरेश धोंडीराम कदम (मुळ गांव- भुयाचीवाडी ता. कराड, सध्या रा. कल्याण भिवंडी- ठाणे) हे काल नाईकबा यात्रेस गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चोरी झाल्याचे पाहिले यानंतर त्यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात जाऊन घटनेबाबत फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीनुसार, जानुगडेवाडी (ता.पाटण) येथे नाईकबा यात्रेनिमित्त गेले होते. जाताना सुरेश कदम यांनी बंगल्याचा सेप्टी दरवाजा बंद करून त्यास कुलप लावण्यात आले होते.
सोमवार, दि. 27 मार्च रोजी फिर्यादी यांचे बंधू यांनी फोन करून सांगितले की, बंगल्याचा सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून बंगल्यात चोरी झालेली आहे. चोरटयांनी बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचा कोयंडा तोडुन बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट कटावणीने उचकटून त्यामध्ये असणारे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
चोरटयांनी कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे साडे चौदा तोळ्यांची तीन गंठण, 40 हजारांचे दिड तोळ्याचे मिनी गंठन, 80 हजार रुपये किंमतीचा अडीच तोळ्याचा व दिड तोळ्याचा लक्ष्मी हार, 60 हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची चैन व अर्ध्या तोळ्याची चैन, 50 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची हिहिऱ्याच्या अंगठीसह अर्ध्या तोळ्याच्या तीन अंगठ्या तसेच 1 तोळ्याची कर्णफुले, 80 हजार रुपये किंमतीची चार तोळ्याची चैन व 6 हजारांची रोख रक्कम असा मिळून सुमारे 5 लाख 16 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या सर्व सोन्याच्या दागिन्यांची किंमत सध्या बाजारभावानुसार 18 लाख रुपयांच्या आसपास होत आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात रात्री उशिरा उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.