(लेखन ः- राजेश साळुंखे, नवी मुंबई)ः- स्वातंत्र्यापूर्व काळात नुसता ब्रिटिश ऑफिसरला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे (दादा) हे मालदन गावाचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते सतत भाग घेत राहिले. ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकारवर जेवढा जास्त दबाव टाकता येईल, त्या प्रकारे टाकून इंग्रजांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न केले. दादा सारख्या अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि प्रयत्नाचे यश म्हणजे भारताचे स्वतंत्र होय.
दादांचे बालपण ः- दादांचा जन्म 12 सप्टेंबर 1917 रोजी कापील (ता. कराड) या ठिकाणी झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्मास आलेले दादा यांचे मूळचे गाव दिक्षी (ता. पाटण) हे होय. दादा दीड वर्षाचे असताना त्यांच्या आईचा साथीच्या रोगात तीव्र तापाने तिचा मृत्यू झाला. दादांचे वडील शेतकरी होते, काही वर्षानंतर म्हणजे दादा 4-5 वर्षाचे असताना देवीच्या रोगाने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र दादांचा पूर्णपणे मावशींनी सांभाळ केला. दादांनी जुन्यातील सातवी शिक्षण पूर्ण केले. मावशीला कोणतेही अपत्य नसल्याने मावशीचा वारस हे दादाच होते. कुठेतरी नोकरी करून 5-10 रुपये पगार मिळवण्यापेक्षा त्यांनी शेती वरच भर दिला. दादा खूप वाचन करायचे.
दादा गांधी विचारसरणीचे होते, गांधीजींना खूप अनुसरण करत होते. गांधींच्या सभा ऐकणे, त्यांचे साहित्य वाचणे हा आवडता छंद होता. पण मधल्या काळात भगतसिंग व इतरांचे जे असहयोग आंदोलन चिघळले. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील आणि सातारा जिल्ह्यातील इतर क्रांतिकारक यांनी सुद्धा समांतर लढा देण्याचं ठरवलं. त्याचाच भाग म्हणून अनेक क्रांतिकारी युवक नाना पाटील यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामध्ये पांडुरंग नारायण साळुंखे हे एक होते.
स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी होण्यास प्रेरक घटना :- तसे पहिले तर दादांनी कधीही हिंसेला समर्थन दिले नव्हते, मात्र तो काळ होता. साधारण 1938- 1940 चा तेव्हा तरुण पिढीच्या डोक्यात एकच भिनत होते. अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र कधीही मिळणार नाही, आणि साहजिक तरुण क्रांतिकारकांचा कल असहयोग आंदोलन (Non Cooperation Movement) याकडे वळला. याचे नेतृत्व महाराष्ट्रातून नाना पाटील करत होते. त्याच दरम्यान गांधीजींनी छोडो भारत चा नारा दिला, अनेक क्रांतिकारक एकवटले गेले. याचाच एक भाग म्हणजे मालदन गावातील पोलीस गेटवर झालेलं तरुण क्रांतिकारांचा आंदोलन, पोलीस गेटला
कोणी लोक गॅटी म्हणायचे. गॅटी म्हणजे इंग्रजांच्या काळातील पोलीस स्टेशन, जे छोटे जेल आणि स्टेशन असायचे. त्यांना पोलीस गेट बोलायचे. पोलीस गेटची निर्मिती हि फक्त राजकैदी आणि छोटे गुन्हेगार यांच्यासाठी केली गेली होती. जे कोण ब्रिटिश सरकार विरुद्ध बोलेल त्यांना पोलीस गेटमध्ये डांबलं जायचं, तिथून तालुका किंवा जिल्ह्याच्या जेलला नेले जात. साधारण मालदनची गेट सुद्धा 1925 ते 1930 या काळात बांधली गेली असावी. पोलीस गेटची कित्येक क्रातिकारकांना येथेच अटक केली गेली. पांडुरंग नारायण साळुंखे याना सुद्धा इथंच पकडलं आणि काहीदिवस इथंच ठेवले. पूढे त्यांना दुसऱ्या जेल मध्ये पाठवलं. पुढे इंग्रज भारत सोडून गेले आणि आमच्या गावच पोलीस स्टेशन ओस पडलं. याच पोलीस गेटने पाहिलेले एक क्रांतिकारक म्हणजे पांडुरंग नारायण साळुंखे.
स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी:- ऑक्टोबर 1941 मध्ये या तरुण कार्यकर्त्यांचा मालदन, मानेवाडी, ढेबेवाडी भाग असेल अगदी सांगली जिल्ह्यातील सुद्धा काही लोक एवढ्या सर्वांचा एक प्लॅन ठरला होता. कोणीतरी एक इंग्रज अधिकारी (केसची बरीच माहिती घेतल्यानंतर ते नाव रीडर असे काहीतरी आहे. कारण त्या नावाचा जास्त कुठेही उल्लेख नाही फक्त ब्रिटिश ऑफिसर अशी नोंद आहे) हे जूनच्या मध्यावर मालदन येथील पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी येणार होते. भगतसिंग आणि चंद्रशेखर पंडितजी यांनी केलेली पोलीस अधिकाऱ्याची हत्या याला प्रवृत्त होऊन आणि गांधीजींच्या छोडो भारत आंदोलनाला अनुसरून काही तरुण कार्यकर्तांनी ठरवले होते. या ऑफिसरला सुद्धा धडा शिकवायचा. त्याची हत्या करायची असा कुठलाही प्लॅन नव्हता, त्याला फक्त काळे झेंडे दाखवायचे होते आणि त्याला माघारी परतवायचे होते. ठरल्याप्रमाणे 17 ऑक्टोबर 1941 रोजी सर्वजण पहाटे तयारच होते. कोणी झाडावर कोणी कुठे लपून असे बसले होते. पहाटे 5 वाजता ब्रिटिश ऑफिसर यांचे आगमन झाले, इंग्रज सरकारमध्ये मोठे पद असल्या कारणाने त्यांच्या सोबत 6-7 जणांची त्यांची सिक्युरिटी होती. मात्र, काळे झेंडे दाखवत क्रांतिकारी पुढे पुढे येत होते, इंग्रज चले जाव, रायडर चाले जाव या घोषणा देत ते पुढे सरसावत होते. त्या इंग्रज ऑफिसरने कोणताही धोका होऊ नये, म्हणून यांच्या पुढे हार मानली. पुढे काहीतरी धोका होईल या भीतीने पहाटेच तो घोडागाडीने परत जाण्यास निघाला. मग ह्या कार्यकर्त्यांनी त्यात सर्वात आघाडीवर दादा होते. कारण ते इथले स्थानिक होते. यांनी पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकावला. त्या
काळात तिरंगा फडकवणे, हा गुन्हा होता. तेव्हा वेळेने पलटी खाली आणि 30-40 पोलिसांनी संपूर्ण पोलीस गेटला वेढा मारला. यावेळी 3 क्रांतिकारक पळून गेले 4 जण सापडले. त्यामध्ये मालदन गावातील दादा फक्त होते, बाकी बाहेर गावचे तरुण क्रांतिकारी होते. या 6-7 जणांनी पहाटे चार ते साडे पाचपर्यंत सर्व इंग्रज पोलीस आणि अधिकारी यांच्यावर वर्चस्व गाजवले होते. मात्र 5.30 वाजता परिस्थिती बदलली आणि संपूर्ण मैदान ला 30-40 पोलिसांनी वेढा घातला.
पोलिसांनी 4 जणांना पकडले नंतर त्यांना साखळदंडात बांधण्यात आले, संपूर्ण सुरक्षेसह संपूर्ण गावभर धिंड काढण्यात आली. क्रांतिकारकाना वरून आदेश होते, कोणतीही माहिती पोलिसांना सांगायची नाही. त्यापद्धतीने दादा व इतर 3 यांनी कसलीच माहिती दिली नाही . पहिला दिवस मालदन येथील पोलीस स्टेशन मधेच ठेवण्यात आले. पाचव्या दिवशी दादांची रवानगी पाटण येथील जेल मध्ये झाली. कोर्टात केस चालू झाली, राज कैद्याची केस असल्या कारणाने केस प्रक्रिया फर्स्ट प्रायोरिटीवर घेण्यात आली. दादांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्याच्यावरती विविध कलम अंतर्गत गुन्हे टाकण्यात आले होते. त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा सुरवातीला 7 वर्षाची होती नंतर ती कमी करून 5.5 वर्षाची करण्यात आली. पुढे 3-4 महिन्यांनी त्यांना पुणे, विजापूर, पुणे आणि सातारा असा त्यांचा जेलचा प्रवास झाला. एकूण साधारण अडीच वर्ष त्यांनी शिक्षा भोगली. दादा जोपर्यंत जेलमध्ये होते. तोपर्यंत त्या धक्याने दादांच्या दोन्ही मावशांचे (ज्यांनी दादांना सांभाळले) निधन झाले. लहान मुले यांचा संसार आणि जबाबदारी दादांच्या पत्नी ताराबाई पांडुरंग साळुंखे यांनी सांभाळली.
दादांचा शासनाकडून गाैरव :- पुढे दादांनी सुटका झाल्यावर सुद्धा वेळोवेळी स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यक्रमात भाग घेतला. दादांना एकूण 3 मुलगे आणि 4 मुली आपत्ये होत. पुढे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दादांना पेन्शन देण्यात आली. वेळोवेळी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठी वेगवेगळी बक्षीसे, शाबासकी आणि सत्कार करण्यात आले. यामध्ये ताम्रपत्र, मानपत्र, सन्मानचिन्ह, वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार असे बरेच काही मिळत गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे काळात त्यांना ताम्रपात्र देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे माजी मुख्यमंत्री ए. आर अंतुले आणि विलासराव देशमुख यांच्या काळात मुंबई आणि सातारा याठिकाणी त्यांचा गाैरव केला. दादांचे निधन 20 मे 2007 रोजी मालदन गावी रहात्या घरी झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.