औरंगाबाद – तालुक्यातील आडगाव येथे पौष पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या दंगलीमध्ये वडखा येथील पहिलवानास पराभूत करुन देवळाईच्या पहिलवानाने कुस्ती जिंकली आणि वादाची ठिणगी पडली. वादाचे रुपांतर दंगलीमध्ये झाले. जोरदार दगडफेक सुरू झाली. संयोजक व पहिलवानात फ्रिस्टाईल मारामारी झाली. दगडफेकीत उपसरपंचासह देवळाईतील तीनजण गंभीर जखमी झाले असून पहिलवानासह एकास गायब केल्याचा आरोप नातेवाईकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी झाली. रात्री उशिरापर्यंत उपअधीक्षक भवर व चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बेपत्ता तरुणांचा शोध घेत होते.
कोरोनामुळे दोन वर्षे यात्रेवर बंधने होती. यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना ग्रामस्थांनी विनापरवानगी यात्रा भरविली. कुस्तीची दंगलही आयोजित केली. त्यानंतर सायंकाळी कुस्ती जिंकल्यावरुन खेळात दुजाभाव केला असा आरोप करीत कुस्ती जिंकलीच नाही, परत खेळा मी तयार आहे. असे म्हणत पराभूत वडखा येथील पहिलवानाने गोंधळ घातला. त्याचवेळी अज्ञाताने गर्दीवर दगडफेक केली आणि एकमेकांवर दगडाचा वर्षाव सुरू झाला. संयोजकांनी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, साथीदार जुबेर यूसूफ शेख, अबू सालेब जहुर शेख, आबुजर इद्रीस खान यांना मारहाण केली. दगडफेकीमुळे लोक सैरावैरा पळत होते.
दरम्यान देवळाई येथील विजयी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, समीर खान आयुब खान या दोघांचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांना शोध लागला नव्हता. नातेवाईकांचा आरोप आहे की, दोघांना गावकऱ्यांनीच डांबून ठेवले असावे. रात्री चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. पोलीस अधीक्षकानी दिलेल्या सूचनांनुसार पोलिसाच्या पथकाने जाऊन बेपत्ता पहिलवानांची शोधमोहिम राबविली. अन्य तीन जणांची एका घरातून सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.