सांगली प्रतिनिधी । सांगली शहरातील नवीन बायपास रोडवर असणाऱ्या व्यंकटेश सृष्टी मध्ये बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल पाऊणे पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह, मनगटी घड्याळ लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत मिलिंद मछिंद्र लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
मिलिंद लभाने हे बायपास चौकानजीक असणाऱ्या व्यंकटेश सृष्टीमधील एका बंगल्यामध्ये राहतात. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. एका पेट्रोलियम कंपनी मध्ये ते काम करतात. शनिवारी सकाळी आठ वाजता ते घराला कुलूप लावून विजापूर येथे कामानिमित्त गेले होते. रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला. लोखंडी कपाट व लॉकर तोडून कपाटातील पाऊणे पाच लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला. यामध्ये हिरे, सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, कडा, चैन, अंगठी, कानातले जोडे, एक घड्याळ व रोख २५ हजार रुपयांचा समावेश आहे.
याबाबत लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सांगली शहरासह, उपनगरांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे. पोलीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा सध्या चोरटे उचलत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.