हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला शिवसेना पदाधिधिकाऱ्यांकडुन करण्यात आला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. मात्र मी कोणालाही घाबरणार नाही असेही त्यांनी म्हंटल.
रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना म्हंटल की, तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, असं त्या म्हणाल्या.
मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली